पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश निघाले. ठिकठिकाणी वाळूच्या पोत्यांचे बॅरिकेड उभारून २४ तास सशस्त्र पोलिसांची नेमणूक केली गेली. कोरेगाव परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले. कोपर्या कोपर्यावर बंदूकधारी सुरक्षासैनिक दिसू लागले. ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे हे उशीरा सुचलेले शहाणपण होते. तरीपण पोलिस यंत्रणेने केलेल्या या उपाय योजनेमुळे या परिसरातील लोकांना सुरक्षितता वाटू लागली.
बॉम्बस्फोट होऊन बरेच दिवस झाले तरी यात खंड पडला नाही. अजूनही अशा पद्धतीची दिखाऊ सुरक्षा व्यवस्था ठेवून खरे काय साधले जात आहे हे कळत नाही. कारण अतिरेकी ओळखण्यासारखा ड्रेस घालून येत नाहीत. अतिरेकी या पद्धतीला घाबरतील अशी कल्पना असेल तर ती व्यर्थ आहे. उलट दृश्य स्वरुपातील सुरक्षा व्यवस्थेमुळे अतिरेकी सावध होतात. अतिरेक्यांना अशा सुरक्षा व्यवस्थेवर हल्ला करणे सोपे जाते.
सुरक्षा ठेवायचीच तर ती साध्या वेषातील पोलिसांची ठेवायला हवी. पोलिसांच्या उभा राहण्याच्या जागा कोणाच्या लक्षात येणार नाहीत अशा हव्यात. योग्य जागी सीसीटीव्ही व छुपे कॅमेरे ठेवून वास्तूंचे रक्षण करावयास हवे. अमेरिकेत वाहतूक नियंत्रण व्यवस्था पाहणारे पोलिस आडबाजूला उभे असतात. सिग्नल खांबावरच छुपे कॅमेरे असतात. मॉलमध्ये गिर्हाइकांवर लक्ष ठेवणारे कॅमेरे कोठे आहेत हे शोधूनही सापडत नाहीत.
सुरक्षाव्यवस्था खरे म्हणजे दुहेरी हवी. एक दृश्य स्वरुपातील. फक्त लोकांच्या समाधानासाठी. दुसरी मात्र अदृश्य पण अधिक सक्षम व अतिरेक्यांना गाफिल ठेवून त्यांच्यावर त्वरित कार्य करणारी.
आपली सुरक्षा व्यवस्था अशीच दुहेरी व अतिरेक्यांशी मुकाबला करण्यास सक्षम आहे अशी आशा करू या.
No comments:
Post a Comment