इंटरनेट परस्पर संपर्क वाढविण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी व उद्योग/व्यवसाय करण्यासाठी एक प्रभावी व अत्यंत कमी खर्चाचे साधन असले तरी त्याचा उपयोग या विधायक कार्यासाठी न करता मनोरंजन, व्हिडिओ गेम खेळणे, फोटोगॅलरी, गाणी व सिनेमा व गप्पा मारणे यासाठीच वापरण्याची सवय नव्या पिढीला लागली आहे. विद्यार्थीच नव्हे तर कंपनीत काम करणारेही याचा बिनदिक्कत वापर करतात असे आढळून आले आहे. नेटकॅफेवर होणारी गर्दी ही बहुतेकवेळा याच कारणासाठी होत असते. अनेक कंपन्या अशा स्थितीचा फायदा घेण्यासाठी सोशल नेटवर्कींगच्या नावाखाली निरनिराळी मनोरंजनाची व आर्थिक लाभाची प्रलोभने दाखवतात व आपल्या जाळ्यात ऒढतात.
यावर उपाय म्हणून बर्याच मोठ्या कंपन्यांमध्ये कंपनीची वेबसाईट सोडून इतर वेबसाईट उघडता येणार नाही याची व्यवस्था केलेली असते. शिवाय कामाच्या जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कर्मचार्यांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवली जाते. कॉम्प्युटरवर केलेल्या सर्व कामाचे लॉगिंग केले जाते. तसेच कंपनीतील माहिती बाहेर पाठविली जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
शाळा कॉलेजात वा छोट्या संगणक संस्थांमध्ये अशी देखरेख व नियंत्रण ठेवणे अशक्य असते. याचा फायदा घेऊन इंटरनेटचा व असलेल्या सुविधांचा केवळ करमणुकीसाठी वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. याची सवय लागली की ती सूटणे दूरच त्यात वाढ होत जाऊन त्याचे अडिक्शन बनते. आमच्या मुलाना कॉम्प्युटर येतो व ते कॉम्प्युटरवर तासन तास वा रात्रभर बसतात असे पालक, शिक्षक अभिमानाने सांगत असले तरी ती मुले कॉम्प्युटरवर काय करतात याकडे त्यांचे दुर्लक्ष असते. छोट्या कंपन्यांमध्येही कर्मचार्यांना जास्त स्वातंत्र्य दिले जाते व त्याचा गैर फायदा घेतला जातो.
कॉलेज व कंपनीतील दोन्ही ठिकाणचा माझा अनुभव असाच आहे. प्रत्येकाच्या कामावर वैयक्तिक लक्ष ठेवणे मला आवडत नाही. पूर्ण स्वातंत्र्य असले तरच संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम इंटरनेटवरील माहितीचा शोध व वापर करून अधिक गतीने करता येते हे मला माहीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय किंवा आमच्या कंपनीतील कर्मचार्यांना मी सहसा पूर्ण स्वातंत्र्य देतो. मात्र कॉम्प्युटरवर हार्ड डिस्कवर मला बर्याच वेळा सिनेमातील गाणी, सिनेमे, व्हिडिओ गेम डाऊनलोड केलेले पाहण्यात येतात. आर्कुट, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींगच्या साईटस् व पिकासा, फ्लिकर सारख्या फोटो गॅलरीच्या सुविधांचा वापर केल्याचे दिसते तेव्हा मन खिन्न होते.
तंत्रविज्ञानाने आपल्याला दिलेल्या या अमूल्य सुविधेचा आपण असा गैरवापर करू लागलो तर त्याचा फायदा होण्याऎवजी आपल्या कामाचे वा अभ्यासाचे नुकसान हॊन्याचाच संभव अधिक असतो. मनोरंजनपर सेवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करताना अनेक व्हायरस चा आपल्या संगणक प्रणालीत शिरकाव होऊन केलेले सर्व काम क्षणार्धात नाहिसे होण्याचे, चोरीला जाण्याचे वा सारी यंत्रणाच हतबल व संथ होण्याची शक्यता असते याचाही विसर पडतो. त्यातच खोट्या भूलथापांना बळी पडून आपली फसगत होण्याचे व नकळत कोठल्यातरी गुन्ह्यात अडकण्याचे व पूर्ण करिअर बाद होण्याचे धोके असतात याची त्याना जाणीव नसते. असे काही घडले की नंतर पश्चाताप होऊन काही उपयोग नसतो.
चांगली हुशार मुले इंटरनेटच्या अशा हव्यासापायी शाळा कॉलेजला दांड्या मारून नेटकॅफेत वेळ घालवतात व आपले कायमचे नुकसान करून घेतात.
इंटरनेटचा जबाबदारीने वापर करण्याचे बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. अन्यथा दिलेले स्वातंत्र्य काढून टाकण्याशिवाय पर्याय रहात नाही. इंटरनेटच्या सुविधांचा संशोधनात वा कंपनीचे काम करण्यासाठी उपयोग करण्यात अडचणी येतात. शिवाय कडक नियंत्रण असल्याने दबावाखाली काम करावे लागते.
अशी सवय लागली तर मोठ्या कंपन्यात काम करणे जमत नाही. नोकरीत असताना असे गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले तर तडकाफडकी नोकरी जाण्याची भिती असते. अन्यथा संगणकप्रणाली बिघडवण्याचा दोषारोपास सामोरे जावे लागते.
स्वयंशिस्त लावून इंटरनेटचा वापर जबाबदारीने केला तरच आपल्याला इंटरनेटचा खरा फायदा घेता येईल.अन्यथा मिळालेल्या स्वातंत्र्याचा व सुविधांचा गैरवापर करून आपण आपले स्वतःचे व आपल्या कंपनीचे नुकसान करून घेऊ.
No comments:
Post a Comment