Friday, September 3, 2010

खोट्या इ-मेल व स्पॅम जाहिरातींपासून सावधान

बर्‍याच वेळा आपल्याला बक्षिस वा लॉटरी लागल्याच्या इ मेल येतात. काही वेळा मोठी रक्कम असलेला आपल्या नावाचा चेकही स्कॅन करून पाठविलेला असतो. इ मेल पाठविणार्‍या कंपनीचे नाव प्रसिद्ध कम्पनीच्या नावाशी मिळतेजुळते असते. त्यामुळे खोटेपणाबद्दल शंका येत नाही. फुकट पैसे मिळणार या कल्पनेने अनेक नवखे वा अनभिज्ञ लोक आपली माहिती ( फोटो, पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर) पाठवितात. नंतर त्याना आपण फसविले गेलो असल्याचे समजते. आपल्या बॅंकेच्या खात्यातून परस्पर पैसे काढले जातात. आपल्या नावावर ऑन लाईन वा दुकानात खरेदी केली जाते. एकदा पैसे गेल्यावर मग काहीच करता येत नाही. कारण इ मेल पाठविणारा गायब होतो. इ मेल पाठविणारी कंपनी अस्तित्वातच नाही हे कळते.
आपल्या मित्राची वा नातेवाईकाची संकटात अडकलेल्याची व मनी ट्रॅन्स्फर एजन्सीद्वारा ताबडतोब पैसे पाठविण्याची मेल आली की आपण गोंधळून जातो. काही वेळा भावनेच्या भरात पैसे पाठवितो. नंतर कळते की त्या मित्राची मेल खोटी होती. कोणीतरी मित्राच्या इमेलचा पासवर्ड मिळवून त्यावरून खोती मेल पाठविलेली असते. अशावेळी त्या मित्राशी फोनवर संपर्क साधावा किंवा त्याच्या दुसर्‍या इमेलवर त्याला मेल आल्याचे कळवावे व खात्री करून घ्यावी.

आपल्याला अनेकवेळा आपल्या मित्रांकडून संपर्क साधण्यासाठी, फोटो पाहण्यासाठी वा अन्य कारणासाठी निमंत्रण मेल येतात. त्यावेळी त्या मित्राचे नाव व मेल पाहून आपण निमंत्रण स्वीकारतो. मग आपले नाव, इमेल अशी माहिती भरायला सांगून आपले नाव सदस्य म्हणून नोदविले जाते. नंतर आपल्या मित्रांना निमंत्रण पाठविण्यासाठी आपला याहू वा जीमेलचा इमेल आयडी व पासवर्ड विचारला जातो. आपल्या पासवर्डचा कोणताही दुरुपयोग केला जाणार नाही अशी ग्वाही दिली जाते. आपण ही माहिती दिली की आपल्या नावाने आपल्या सर्व मित्रांना निमंत्रण पाठविले जाते. सोशल नेटवर्कींगच्या या पद्धतीचा गैरवापर करून अश्लील वा लॉटरीच्या जाहिरातीं पाठविल्या जातात.

वरील सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. याविषयी प्रत्यक्ष अनुभवातील उदाहरणे व अशा खोट्या इ मेलचा प्रसार थांबविण्यासाठी काय केले पाहिजे. इंटरनेटवरच याविषयी काय माहिती आहे. फसविणार्‍या व्यक्ती वा संस्थेचा शोध कसा घ्यावा याविषयी माहिती या ब्लॉगवर देण्यात येणार आहे.


सांगलीतील माझे मित्र व प्रसिद्ध सर्जन यांचा मला फोन आला. त्यांच्या याहू मेलवरून कोणीतरी सर्वांना मेल केली होती की ते अनोळख्या जागी अडकून पडले आहेत. त्यांचे सर्व सामान चोरीस गेले आहे व त्वरीत मनी ट्रॅन्स्फरने त्यांच्या नावे पैसे पाठविण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात त्याना याहू अकौंट उघडता येत नव्हते कारण त्याचा पासवर्ड बदलण्यात आला होता. त्यांनी विचारले आता काय करायचे. मी त्यांना सांगितले की सर्वाना या खोट्या मेलबद्दल सावधान करा व याहू अकौंट बंद करण्यासाठी याहू ऑफीसशी संपर्क साधा.

एकदा मला अमेरिकेतील माझ्याशी इमेलने संपर्कात असणार्‍या लेखकाची मला मेल आली की त्यांना मलेशियात टूरवर असताना कोणीतरी पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडले आहे व हॉटेलचे पैसे भरण्यासाठी वा परतीच्या विमानाचे तिकीट काढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. घरच्या लोकांना काळजी वाटू नये म्हणून त्याना न कळविता माझ्याकडे त्यांनी पैसे पाठविण्याची मागणी केली होती. मी प्रथम त्यांच्या दुसर्‍या इमेलवर निरोप पाठवून मेल खोटी असल्याची खात्री करून घेतली. नंतर सर्वांना तसे कळविण्यास सांगितले.

त्यानंतर अशा मेल आल्या की मी स्पॅम म्हणून काढून टाकत असे.

काल पुण्यात असताना मला अशीच एक पुण्यातीलच माझ्या मित्राच्या नावे मेल आली. स्पेनमध्ये माद्रिद येथे असौन पैसे पाठविण्याची विनंती त्यात केली होती. मी त्या माझ्या मित्राला फोन केला तर त्याने दोन दिवसापूर्वीच त्याचे याहू अकौंट हॅक झाल्याचे त्याने सांगितले. माझ्या मनात आले की खोटी मेल पाठविणार्‍या व्यक्तीस गाफ़ील ठेऊन त्याच्याबद्दल माहिती मिळविली तर. मग मी त्या मेलला उत्तर पाठवून पैसे कसे पाठवायचे याची विचारणा केली. त्याला लगेच उत्तर आले की वेस्टर्न युनियन मार्फत वा मनी ट्रॅन्स्फरने पैसे पाठवावेत. मी त्याला परत मेल पाठविली की तुमच्या आयडेंटिटीसाठी तुमची अधिक माहिती कळवा. माझा उद्देश असा होता की आनखी काय काय माहिती त्याने मिळविली आहे ते जाणणे. अजून काही त्या मेलचे उत्तर आले नाही आल्यावर याच ब्लॉग याबद्दल माहिती देईन.

दरम्यान मी वेस्टर्न युनियनच्या संकेतस्थळावर मेल पाठविणार्‍या व्यक्तीविषयी काही माहिती मिळते का पाहिले. तेथे केवळ इमेलवर पैसे पाठविण्याची सोय होती व स्पॅम व फ्रॉडबद्दल विशेष माहिती होती. स्पेनमधील माद्रिद येथे याविषयी शोध घेता त्यांचेही मनीफ्रॉडविषयी संकेतस्थल असल्याचे दिसले.
संदर्भ संकेतस्थळे
http://www.westernunion.com/info/fraudTips.asp?country=global

http://www.westernunion.com/info/fraudScams.asp?country=global

http://www.phonebusters.com/english/recognizeit_emergency.html

http://www.phonebusters.com/english/reportit.html

एकंतरित पाहता इंटरनेटच्या जाळ्यात अनेक कोळी आपले सावज पकडण्यासाठी ना ना प्रकारची आमिषे वा सोंगे घेऊन बसलेली असतात. त्यांच्यापासून सावध असले पाहिजे. व अशा फसवणुकीविषयी सर्वांना प्रशिक्षित करायची आवश्यकता आहे.
४ सप्टेंबरला सकाळ न्यूजग्रुपतर्फे ब्लॉगर्ससाठी अशी एक व्हिडिओ कॉन्फरन्स होणार झाली. त्याचा वृत्तान्त ‘इसकाळ’ मध्ये आला आहे तो खालील दुव्यावर पहावा.

ब्लॉगींगलादेखील आहे कॉपीराईट संरक्षण (सकाळ वृत्तसेवा - Saturday, September 04, 2010 )
माझी प्रतिक्रिया

"मी ब्लॉगर्स कॉन्फरन्सला उपस्थित राहणार होतो. पण काही कारणाने ते शक्य झाले नाही. व्यावसायिक व उद्योजक आता इ मेलचा नव्याने वापर करू लागले आहेत. त्यांचे इ मेल हॅक करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कृपया सायबर खात्याचे इमेल व फोन नंबर्स या सदरात सर्वांसाठी जाहीर करावेत. तसेच हॅक झालेला इमेल कसा बंद करावा याची माहिती द्य़ावी. मी अशाच एका हॅक मेलवरून आलेल्या पैशाच्य़ा मागणी करणार्‍या व्यक्तीशी पैसे देण्याचे आश्वासन देऊन मेलवरून संपर्क ठेवला आहे. त्याची ओळख कशी शोधता येईल ते कळवावे."
माझ्या शोध कथेची माहिती पुढील ब्लॉग मध्ये वाचा.

No comments:

Post a Comment