अमेरिकेच्या गृहखात्यातर्फे २००८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत तात्पुरत्या स्वरुपात राहणार्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचा सर्वात पहिला नंबर लागतो. एकूण १८,३०,००० अशा नागरिकांमध्ये ४,००,००० भारतीय, १,५०,००० कॅनेडियन तर १,४०,००० दक्षिण कोरियन आहेत. एकूण आशियाई देशांतील नागरीक ५३ टक्के असून त्यात भारतीय २२ टक्के, दक्षिण कोरिया ८ टक्के, चीन ७ टक्के, जपान ६ टक्के तर तैवान २ टक्के आहेत. यामध्ये विद्यार्थी, ठराविक कालावधीचा व्हिसा असणारे कर्मचारी, पर्यटन व्हिसा असणारे प्रवासी व वकिलातीचे व अन्य प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश होतो. संख्येच्या दृष्टीने कॅलिफोर्निया सर्वात जास्त व नंतर न्यूयार्क व त्यानंतर टेक्सास या स्टेटमध्ये प्रामुख्याने असे भारतीय राहत आहेत.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांचे असणारे योगदान सर्वश्रुत आहे. सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् या एस. एस. क्षत्रिय यानी लिहिलेल्या पुस्तकात (पुस्तक परिचय) याविषयी अद्ययावत माहिती आहे.
२००२ मध्ये केलेल्या जनगणनेनुसार त्यावेळी अमेरिकेतील २,३१,००० उद्योग भारतीयांच्या मालकीचे होते व त्यांची किंमत ८९ बिलियन डॉलर होती. या उद्योगांमध्ये ६,१५,००० कर्मचारी होते. २००७ च्या जनगणनेचे निष्कर्ष अजून प्रसिद्ध व्हायचे आहेत. पण वाशिंग्टनमधील भारत-अमेरिका जागतिक व्यापार संस्थेच्या वतीने केलेल्या पाहणीवरून या आकड्यात बरीच वाढ झाली असेल असे दिसते. या सर्वेक्षण प्रकल्पात असे आढळून आले की ९० भारतीय उद्योगांनी २००४ ते २००९ या काळात अमेरिकेत ५.५ बिलियन डॉलर भांडवल घालून स्वतःचे उद्योग सुरू केले व १८००० नवे रोजगार निर्माण केले. २३९ भारतीय कंपन्यांनी येथील ३७२ उद्योग २१ बिलियन डॉलर भांडवल घालून विकत घेतले व यात ४०,००० नवे रोजगार निर्माण झाले. अमेरिकेतील ४० टक्के हॉटेल्स व ३९ टक्के विश्रामगृहे १०,००० भारतीयांच्या मालकीची असून त्यांची किंमत १२९ बिलियन डॉलर आहे व यात ५,८०,००० कर्मचारी काम करतात. भारतातून ९५,००० विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असून त्यांच्याकडून सुमारे २४ लाख डॉलर फी जमा होते. एकूण वैद्यकीय विद्यार्थ्यांपैकी १०-१२ टक्के विद्यार्थी भारतीय असून ५०००० वैद्यकीय पदवीधर व १५,००० विद्यार्थी अमेरिकेतील हॉस्पिटल्स व ग्रामीण भागात कार्य करीत आहेत.
वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की अमेरिकेच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात इतर देशांपेक्षा भारतीयांचा महत्वाचा सहभाग असून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत व विकासात ते महत्वाचे योगदान देत आहेत.
No comments:
Post a Comment