Monday, July 5, 2010

एका निखळ मैत्रीपर्वाची अखेर

(माझे मित्र डॉ. भालचंद्र वासुदेव करंदीकर यांचे २७ जून २०१० रोजी दुःखद निधन झाले. त्यांना वाहिलेली माझी श्रद्धांजली)

शाळेपासून गाढ मैत्री असणा‍रा माझा जिवलग मित्र हे जग सोडून गेला ही बातमी वाचली आणि मन विलक्षण बेचैन झाले.

भालू उर्फ डॉ. भालचंद्र वासुदेव करंदीकर माझा शाळेपासूनचा मित्र. गेली काही वर्षे विकलांग अवस्थेत तो अंथरुणाला खिळून होता. या काळात मी त्याला वरचेवर भेटत असे मात्र अशा भेटीच्या वेळी मला त्याची स्थिती पाहवत नसे. या आजारातून तू नक्की बरा होशील अशी वेडी आशा त्याला लावण्याचा मी प्रयत्न करी. तोही हे सर्व समजूनही तसे न दाखविता स्वतःचे दुःख विसरून माझ्या कामाचे कौतुक करी व आग्रहाने माझा पाहुणचार करण्यास सांगे हे पाहून मला गहिवरून येत असे. माझ्या भेटीमुळे कदाचित त्याला व त्याची शुश्रुषा करणार्‍या नातेवाईकांना मानसिक त्रासही होत असेल या कल्पनेने हल्ली मी भॆटण्याचे टाळत होतो. त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर दुःख झाले परंतु त्याची या त्रासातून सुटका झाली या कल्पनेने थोडे हायसे वाटले. त्याच्यासारखा दिलदार, सतत आनंदी असणारा, विविध कलांत निपुण असूनही गर्वाचा लवलेश नसणारा असा मित्र काळाच्या पडद्याआड गेला आणि आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा ठेवा कायमचा गमावल्याचे तीव्रतेने जाणवले.

१९५८-५९चा काळ.सातारला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी शिकत होतो. आठवीत माझ्या वर्गात भालू दाखल झाला आणि लगेचच आमची मैत्री जमली. आमचे शिक्षक श्री. ग. वा. करंदीकरांचा धाकटा भाऊ माझा मित्र आहे याचा मला अभिमान वाटायचा. भालू अक्षरलेखन, चित्रकला, गायन यात तरबेज असल्याने प्रत्यक्षात वयाने थॊडा कमी असला तरी उंचीने माझ्यापेक्षा जास्त व वृत्तीनेही प्रौढ असल्याने मला तो थोरल्या भावासारखा वाटायचा. त्याचीही माझ्याकडे बघण्याची दृष्टी धाकट्या भावाप्रमाणे काळजीवाहू असायची.

शाळा संपल्यानंतर आम्ही शिवाजी कॉलेजमध्ये प्री डिग्रीला प्रवेश घेतला तेव्हापासून आमच्या मैत्रीला खरा बहर आला. रोज संध्याकाळी आम्ही एकत्र फिरायला जायचो. घराच्या कोपर्‍यावरच तासन्‌तास गप्पा मारायचो. विषय तर कोणतेही चालायचे. त्याची आवड कला व साहित्य तर माझी विज्ञान व समाजकारण. राजवाड्यासमोर होणारी भाषणे ऎकणे, वाचलेल्या पुस्तकावर एकमेकांना माहिती सांगणे, एवढेच काय अभ्यासाच्या विषयांवरही चर्चा करणे आम्हाला आवडायचे.भालू देवावर श्रद्धा असणारा तर मी जरा याबाबतीत विज्ञानवादी.त्यामुळे अंधश्रद्धा, धर्म आणि विज्ञान यावर चर्चा तर खूप रंगायची.मात्र एकमेकाच्या मतांचा आदर करण्याचे पथ्यही आम्ही कटाक्षाने पाळले होते.कॉलेजात आमच्या जोडीकडे इतर मुले कुतुहलाने पाहायची. भाऊराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कॉलेजमध्ये कार्यक्रम होता.आदलेदिवशी संध्याकाळीच आम्ही सभाधीटपणा यॆण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असे ठरविले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. जी. पाटील होते. कोणा विद्यार्थ्याला भाषण करायचे आहे का अशी विचारणा झाल्यावर आम्ही दोघांनीच हात वर केले. त्यावेळी ठरवून आम्ही दोघानी भाषण केले व त्याचे कौतुक पाटीलसरांनी केल्यावर आम्हाला केवढा हुरूप आला होता.माझ्या मानसिक जडणघडणीत या कालखंडाचा फार प्रभाव पडला असे मला वाटते.

इंटरसायन्स(आताची बारावी) ला दिवाळीनंतर आम्ही सांगलीला बदलून आलो व भालूशी संपर्क तुटला. भालू बीएएमएसला पुण्यास गेला. माझे इंजिनिअरिंग तर त्याचे वैद्यकीय शिक्षण झाल्यावर सांगलीत पुनः आम्ही एकत्र आलो. मी वालचंद कॉलेजमध्ये तर भालू प्रथम नगरपालिकेत व नंतर सांगली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला.

भालू व्यवसायाने डॉक्टर असला तरी त्याचे मन अस्सल कलावंताचे होते ते डॉक्टरकीत रमले नाही. शिवाय केवळ सेवा भावनेने हा व्यवसाय केल्याने त्यातही म्हणावे तसे भरघोस आर्थिक यश त्याला लाभले नाही. जिल्हा परिषदेच्या नोकरीत अनेकदा दूरच्या गावात बदल्या झाल्याने त्याला एकटेच रहायला लागायचे. पण याबद्दल त्याने कधीही चिडचिड केली नाही. जीवनातील अशा सर्व गोष्टी तो उमद्या मनाने स्वीकारायचा.त्याची गाठ पडली की तो बोलायचा ते नवीन गाण्याबद्दल, नवीन कथेबद्दल वा व्यवसायातील छोट्या छोट्या गमतीदार प्रसंगांबद्दल.त्यामुळे त्याच्या अडचणी वा दुःखे यांची ऎकणार्‍याला कल्पना यायची नाही. सुदैवाने त्याची पत्नी माधवी अतिशय शांत व समंजस होती व तिने आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्याला साथ दिली. प्राजक्ता, प्रतिमा व प्रांजली या तीनही मुलींनी आईबाबांचे सर्व गुण सहजपणे आत्मसात केले. त्यांच्याशी बोलताना भालूचा शांत सौजन्यशील स्वभाव लगेच जाणवतो.

१९९२ पासून ५/६ वर्षे मी ब्रेनच्या ट्यूमरने आजारी होतो. त्यावेळी मला व आमच्या घरातील सर्वांना धीर देण्यासाठी तो वरचेवर आमच्या घरी येई व आपल्या गप्पांनी व गाण्यानी घरातील गंभीर वातावरण पार बदलून टाके. त्यामुळे तो आला की आम्हा सर्वांना हायसे वाटे. घरात कोणीही आजारी पडले की प्रथम त्याचा सल्ला घ्यायचा हे ठरलेलेच होते. तोही अगदी साधे व घरगुती उपाय सांगायचा आणि रोगाची भीती घालवून टाकायचा. भालूचे अक्षर सुंदर होते. गायनाची तर मनस्वी आवड होती.मराठी भावगीतॆ तो इतक्या तन्मयतेने ऎकायचा की त्याला स्वराआलापातील खाचाखोचा शात्रीय गायकाप्रमाणे त्याला समजायच्या व तेवढ्याच ताकतीने मूळ गायकाच्या आवाजात म्हणून दाखवायचा. अनेक बालगीते, नाट्यगीते त्याची तोंडपाठ होती. माझ्या दोन्ही मुलांना ’बाळू होता झोपाळू’ व ’सांग सांग भोलानाथ ..’ ही गाणी त्यानेच पहिल्यांदा ऎकवली. तीही मुलांच्याच भाषेत व हावभाव करुन. मुलेही त्यामुळे भालूकाका आला की खूष व्हायची.

संगीताचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेता केवळ सरावाच्या जोरावर त्याने भावगीत गायनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. सुधीर फडके यांच्यावर त्यांची असीम भक्ती होती. आपल्या भावगीत कार्यक्रमाचॆ सर्व उत्पन्न तो सुधीर फडके यांच्या ’सावरकर चित्रपट निर्मिती’ प्रकल्पास देत असे.त्याने आपल्या मुलीच्या घरी शिकागोला सादर केलेल्या गीतरामायण कार्यक्रमातील काही गाणी आमच्या www.mymarathi.com या संकेतस्थळावर आम्ही प्रसिद्ध केली आणि जगभरातून याला प्रचंद्द प्रतिसाद मिळाला. ( त्यानी गायलेल्या गीतरामायणाची एक झलक )आमच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या या गाण्यामुळेच वाढली. दुर्दैवाने ते कौतुक स्वीकारताना आजारपणाने भालूचा आवाजच नियतीने हिरावून घेतला होता.तरी त्याला याची माहिती झाली याचेच आता समाधान वाटते.

जीवनात कसे जगावे व कोणत्याही प्रसंगास कसे खिलाडू वृत्तीने सामोरे जावे हे त्याने मला शिकवले. आज भालू या जगात नाही. पण त्याने दिलेली ही शिकवण व प्रत्यक्षात स्वतः तसे जगून दाखविले याची आठवण मला माझ्या भावी आयुष्यात सतत साथ देत राहील. लोकार्थाने या मैत्रीपर्वाची अखेर झाली असली तरी त्याची सुखद प्रकाश देणारी ज्योत ही माझ्या मनात तेवत राहील व त्याच्या मंगलमयम जीवनाचे प्रतीक असणारी त्याची सुरेल तान मनाला आल्हाद देत राहील याची मला खात्री आहे.

माझ्या जीवनात आनंद फुलविणार्‍या अशा या माझ्या अद्वितीय मित्रवर्याला माझी विनम्र श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment