Sunday, March 20, 2016

गुरु_शिष्य संवाद

 (अध्यात्मिक गुरू आणि वैज्ञानिक शिष्य यातील संवाद)

गुरू -

तू जे समोर पाहतोस ते सत्य नाही
 तू जे जगतोस ते खरे नाही
 भोवतालचा निसर्ग, झाडे, झुडपे, पशुपक्षी
 ही सर्व माया आहे

सत्य त्या पलिकडे आहे
 या जीवनाची आसक्ती सोड
 तुला आनंद वाटतोय  तो भ्रम आहे
आनंद दु:खाच्या पलिकडे जा
 तेथे तुला चिरशांती लाभेल
 परमानंद होईल

तू विश्व रुपात विलीन होशील
तेव्हा माझे ऎक, या भावभावनांच्या
 गोतावळ्यात मन गुंतवू नकोस
अंतर्मुख हो, जग विसर
 आणि स्वत:ला शोध

अरे वेड्या, कसले माझे, तुझे करतोस
 हा सर्व भास आहे
क्षणभंगूर टिकणारा
जे दिसते, जे जानवते तेसत्य नसून आभास आहे
सत्याचा आभास

तुला वाटते हे वर्तुळ आहे
 नीट तपासून पहा तुला कळेल
 निसर्गात कोठेही पूर्णांशाने वर्तुळ नाही
वर्तुळ, चौरस, त्रिकोण, सरळ रेषा, बिंदु
 दिशा, गती, वेळ
 ही तू शोधलेलीच साधने ना
भोवतालच्या निसर्गाशी जरा ताडून पहा
तुझी सारी शास्त्रे पणाला लाव
 तुला आढळेल पूर्णता कोठेच नाही
 आकृती पूर्ण नाहीत सरळ रेघ, बिंदु अस्तित्वातच नाहीत
 दिशा, गती, वेळ सापेक्ष आहेत

बाहेर नजर टाक
आकाशातील असंख्य तार्‍यांचा वेध घे
तुला कोठेच पूर्णता, स्थिरता वा विश्वव्यापी नियम आढळणार नाहीत

सूक्षदर्शीने वा तुझ्या गणितकौशल्याने सूक्ष्मात शोध घे
 प्रोटॉन, इलेक्ट्रॉन
 किरण, शक्तीविद्युत् चुंबकीय लहरी
 अनेक सिद्धांत मांड
 तुला कोठेच यश येणार नाही
 कारण तू अपूर्ण आहेस

तुझ्या भोवतालचे जग अपूर्ण आहे
 पूर्णता त्या पलिकडे आहे
हो हा सारा भास आहे, ही माया आहे
 माझे ऎक, तुझा तू शोध घे

शिष्य -
 असू दे असू दे, असे, दे
सर्व खोटे असू दे
 पण मला सांगा, तुमचे सत्य कसे आहे? कोठे आहे?

या जगाच्या संदर्भापलिकडे ?
या भाव जीवनाच्या पलिकडे
 या भासमान विश्वापेक्षा वेगळे

 आणि जर असे ते आहे
 तर माझा त्याचा काय संबंध

 तुम्ही मला सांगात ते तरी खरे कशावरून
तुमच्या मनात ज्ञान प्रकाशलॆ असे तुम्ही म्हणता
ते तुम्हाला भासमान का वाटले नाही
 तो भ्रम होता असे का तुम्हाला वाटत नाही

 अंतर्मुख होऊन  दिव्यत्वाचा ध्यास घेतल्याने
 झालेली ती मनाची प्रतिक्रिया आहे  असे मी का म्हणू नये?
तुमच्या वक्तव्याला आधार काय?

तुमचेच मन? की
तुमच्यासारख्या आणखी चार व्यक्तींची अतर्क्यावर श्रद्धा
 सापेक्षता त्यालाही लावता येईल
 तीही अपूर्णच असेल, माया असेल
तुमच्या सत्याला संदर्भ कुठला ?

ग्रहतार्‍यांना संदर्भ आहे
 प्रत्येक झाडाला बीज आहे
आईचा मला संदर्भ आहे
संदर्भाच्या चौकटीत मी
 आणि माझे जग सामावले आहे.

त्यापलिकडे जर तुमचे सत्य असेल
तर मी म्हणेन खुशाल असूदे
कारण ती शेवटी कल्पनाच आहे

भावुक मनाची कविकल्पना
नाशवंत शरिरापासून
 आत्मा वेगळा करून
अमरत्वाची कल्पना जोपासली
 की मनाला धीर येतो

मृत्यूच्या आणि सर्वनाशाच्या भीतीने
 इतरही सर्वजण तुमच्याभोवती गोळा होतात

तुमचे आशादायक तत्वज्ञान ऎकताना
तुम्ही म्हणता ते खरे ठरावे असे त्यांना वाटते
कारण त्यांच्या अस्तित्वाची त्यात काळजी दडलेली असते
त्यांच्या या स्वत्वाला तेथे कुरवाळले जाते

मग साहजिकच सर्व तुम्हाला उद्धारकर्ता
अवतार समजतात
आणि मग तुमच्या शब्दांना दिव्यत्वाचे तेज देऊन
शिष्य दैवत्वाचा बाजार मांडतात

हे माझ्या बुद्धीला पटत नाही
त्यामुळे तुमच्या मतांबद्दल मला आदर असला
तरी माझे विचारच मला अनुकरणीय आहेत

Saturday, March 19, 2016

भग्न आत्मा

 (शरीर, मन आणि आत्म्याचे अविनाशित्व या संकल्पनांमधील संदिग्धता दर्शविणारी माझी फार पूर्वी लिहिलेली कविता)
 Image Ref: http://www.simplypsychology.org/mindbodydebate.html

मी कोण आहे ? माझाच प्रश्न
सो हं माझेच उत्तर

पण या प्रश्नोत्तरात दडल्या आहेत
सार्‍या आयुष्यातील वेदना
 विकार, लालसा, भोग
 या त्रयींची असंख्य आवर्तने
आणि माझ्या तपस्येची एक दुर्गम पाउलवाट

भोगांच्या भोवर्‍यांतून बाहेर पडण्यासाठी
 शरिराची काष्टे केली मला शोधण्यासाठी
 पण मला मात्र माझा शोध कधीच लागला नाही

मात्र जेव्हा शरीर कोसळले तेव्हा मी
 मला ओळखले, अरे ! मी तर आत्मा
ईश्वराचाच अंश
 मनाच्या आवरणामुळे
मी स्वत:ला ओळखले नव्हते

आता मला कळले
 अगदी सहजसुंदर
 मीच तो चिरंतन आत्मा
सार्‍या चराचराचा, भूतभविष्याचा कर्ता

मी दगड, मी माती, मी आकाश, मी पाणी
मी अग्नि, मी वारा, मी सुगंध, मी विहंग

सर्व काही मीच
आणि मी कोणी नाही

 मला रंग नाही, मला आकार नाही
मला वजन नाही, मला श्वसन नाही
मला दु:ख नाही मला हास्य नाही
 मला भावना नाहीत मला विचार नाहीत
 आणि मन --?

ते तर मला मुळीच नाही
हाच का तो मोक्ष?
छे छे ! काय ही जीवघेणी स्थिरता
 पण मला जीवही नाही
 मग मी, मी तरी आहे का

अनादि कालापर्यंत मी जगायचे हे असे
 कां ? केवळ अस्तित्व आहे म्हणून

 चौर्‍याऎशी लक्ष योनी भोगायला मिळाल्या असत्या तर ..
 अहाहा ! काय काळ सुखात गेला असता नाही

 मला रंग, रुप, वास सर्व मिळाले असते
 मला दु:ख झाले असते
 तसाच आनंदही झाला असता

 पण हाय रे दैवा !
 माझाच मी घात केला
 आता मला मरण नाही
 निर्गुण निराकार हे अरसिक अमरत्व
 आता मला भोगायचे आहे



म्हणून सांगतो कृपा करून
आपल्या जीवनाचे हाल करून
माझ्यासारखे विश्वरुप बनण्याचा
प्रयत्न करू नका

त्यापेक्षा आहे ते जीवन आनंदाने जगा
इतरांनाही तसे जगता यावे यासाठी प्रयत्न करा.

मुक्ती

( फार पूर्वी मी लिहिलेली एक कविता)

आज आत्म्याला जगविण्यासाठी
शरिराला मी मारत आहे
अनंत काळच्या बंधनातून
आत्म्याला मी सोडवीत आहे

 मी आहे मन, या मर्त्य शरिराचे
 मुक्तिसाठी आसुसलेले

 मी आज पहात आहे,
आत्म्याला झगडताना
 शरिरकोश फोडण्यासाठी
अविरत धडपडताना

 कोश आता सुकला आहे
 अगदी जीर्ण झाला आहे
 म्हणूनच त्याच्या फटीतून
आत्मा मला दिसत आहे

 मला सर्व ठाऊक आहे
 आत्मा खरा कोण आहे
 आजच त्याला शरिराची
संगत का नको आहे

 मी आहे देवयानी,
शरिर पिता शुक्रमुनी
कच आत्मा पोटी दडी,
रडते मी विद्ध मनी

आत्म्याच्या प्रेमाने
झाले मी वेडी पिशी
शरिराला सांगतसे
नाश तुझा तू करिशी

मी कृतघ्न, मी विव्हल
 आत्म्यासाठी करिते स्वार्पण
कारण मला ठाऊक आहे
आत्मा मला सोडणार आहे.