Thursday, June 30, 2011
'1984' by George Orwel (एकोणिसशे चौर्याऎंशी)
कम्युनिस्ट राजवटीविरोधात लिहिलेल्या Animal farm या कादंबरीनंतर जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेली एकोणिसशे चौर्याऎंशी (1984) ही रुपकात्मक दुसरी कादंबरी त्याच्या मृत्युपूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजे १९५० मध्ये प्रसिद्ध झाली व थोड्याच कालावधीत ती सार्या जगात लोकप्रिय ठरली. सत्ताधीश भविष्यामध्ये आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यक्तीस्वातंत्र्याची कशी गळचेपी करतील व सामान्य माणसाला अगतिक व गुलाम बनवतील याचे विदारक दर्शन या कादंबरीत पहावयास मिळते.
सध्याच्या काळातही त्या कादंबरीत वर्णन केलेली स्थिती येण्याची भीती सामान्य माणसास भेडसावत आहे.
सर्व छोटी राष्ट्रे मोठ्या राष्ट्रांनी गिळंकृत केल्याने पृथ्वीवर ओशनिया, एस्टेशिया व युरेशिया ही तीनच बलाढ्य राष्ट्रे अस्तित्वात आहेत ( स्टॅलिन, मुसोलिनी व हिटलर या सत्ताधीशांचे प्रतीक) व ती एकमेकांशी संघर्ष करून आपापली राज्ये वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी पार्श्वभूमी १९८४ मध्ये तयार होईल अशी कल्पना या कादंबरीत लेखकाने केली आहे. ही सर्व राष्ट्रे आपापल्या देशातील प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवून सत्तेविरुद्ध क्रांती होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत आहे. या कादंबरीचा नायक विन्स्टन स्मिथ हा त्यातील ओशनिया या राष्ट्रातील सामान्य माणूस आहे. विन्स्टनला आपल्या देशाच्या एकाधिकारशाही जुलमी राजसत्तेविरुद्ध संघर्ष करावा असे वाटत असते. त्याच्या संघर्षाची कथा हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.
ओशनिया राज्यात बिगब्रदर ( दादा) या नावाने हा सत्ताधीश ओळखला जातो. ( आपण दादागिरी हा शब्द याच अर्थाने वापरतो.) न्यूस्पीक ही नवी भाषा व टेलीस्क्रीन यंत्रणा यांच्या माध्यमातून सर्व जनतेवर लक्ष ठेवण्याचेच नव्हे तर त्यांच्या विचारांना योग्य वळण देण्याचे काम या देशातील शासनाद्वारे केले जाते. राज्याची अधिकृत व सक्तीची भाषा न्यूस्पीक असून त्यात जुन्या पारंपरिक शब्दांऎवजी नवे शब्द वापरले जातात.
(Newspeak language applies different meanings to things by referencing the ends instead of their means; hence the Ministry of Peace ie Minipax deals with war, and the Ministry of Love ie Miniluv deals with torture. However the Ministries do attempt to achieve that goal; peace through war, and love of Big Brother through brainwashing and torture.)
प्रत्येक घरातील एक भिंत टेलीस्क्रीनची असून त्यातून बिगब्रदर प्रत्येक माणसाला शिक्षण देण्याचे ( व त्याच्या हालचालींवर व बोलण्यावर लक्ष ठेवण्याचे ) काम करतो.
विंन्स्टन जिन्यावरून आपल्या घरात प्रवेश करतो व भितीवरील टेलीस्क्रीनवर दिसणार्या बिगब्रदरला वंदन करतो पण आपला चेहर्यावरील हताशपणा बिगब्रदरच्या ध्यानात येऊ नये यासाठी आपले तोंड फिरवतो येथपासून कादंबरीची सुरुवात होते. त्याला एक ओब्रिएन नावाचा त्याच्यासारखाच क्रांतीकारी सहकारी भेटतो. लपून छपून त्यांचे एकत्र भेटण्याचे व स्वातंत्र्यास उत्सुक व्यक्तींना जोडण्याचे काम तो करीत असतो. सत्य हे केवळ माणसाच्या मनात असते अन्यत्र नाही हे त्या संघटनेचे ब्रीदवाक्य असते. आपण एकटे नाही या कल्पनेने विन्स्टन उत्साही होतो व संघटनेच्या कार्यात सहभागी होतो. जुलिया नावाच्या मुलीशी त्याचे प्रेम जमते. तो तिच्यापुढे आपल्या सर्व भावना व विचार प्रकट करतो. त्याच्या विचारांशी जुलिया सहमती व्यक्त करते.
यानंतर मात्र बिगब्रदरची यंत्रणा त्याला अटक करते तेव्हा त्याला कळते की त्याला भेटलेली सर्व माणसे व जुलियासुद्धा बिगब्रदरनेच तयार केलेल्या जाळ्यातर्फे नेमलेली असतात. त्याच्याविरुद्धचे सर्व पुरावे ओब्रिएन बिगब्रदरला सादर करतो. विन्स्टनच्या मनातील स्वातंत्र्याच्या विचारांची लागण इतरत्र होऊ नये म्हणून त्याचे मन शुद्धीकरणाचे प्रयोग त्याच्यावर केले जातात. तुरुंगातील छळामुळे तो बिगब्रदर सांगतो तेच सत्य हे नवे तत्व स्वीकारतो. त्याच्याकडून ते दिवसरात्र वदवून घेतले जाते. मात्र रात्री झोपेत असतानाचे त्याचे बोलणे मॉनिटर केल्यानंतर त्याच्या मनात अजून स्वातंत्र्याची आस शिल्लक आहे हे बिगब्रदरच्या यंत्रणेस लक्षात येते व त्याच्यावर आणखी प्रभावी उपाय करण्याचे ठरते.
त्याला उंदरांची फार भीती वाटते हे जुलियाकडून कळले असल्याने त्याच्या डोक्यावर उपाशी उंदरांचा पिंजरा ठेवला जातो. अशा प्रकारच्या शारिरिक व मानसिक यातना देऊन विन्स्टनचे पूर्ण शुद्धीकरण करण्यात येते व त्याची सुटका होते. एक आज्ञाधारक व बिगब्रदरचा निष्टावंत माणूस बनविण्याचे कार्य बिगब्रदरने केलेले असते.
विन्स्टन एका क्लबमध्ये बुद्धीबळाचा खेळ खेळत आहे. सर्व बाजूनी चेक बसल्याने तॊ आपला राजा पटाबाहेर उचलून ठेवतो या प्रसंगाने कादंबरीचा शेवट केला आहे.
ज्या काळात टेलिव्हिजन हा शब्दही लोकांना माहीत नव्हता त्या काळात केलेली टेलीस्क्रीनची कल्पना, न्यूस्पीक या मानसशास्त्रावर आधारलेल्या नव्या भाषेची योजना जॉर्ज ऑर्वेलची भविष्यवेधी कल्पनाशक्ती दाखवितात. त्याच्या याच कल्पनांचा रशिया, चीन व अमेरिकेने वापर करून जनमानसावर आपल्या विचारांचा कसा पगडा बसविला हे सर्वज्ञात आहे.
Subscribe to:
Posts (Atom)