Monday, October 27, 2008

माझा भारत - आपला भारत

संदर्भ - दीपावलीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या ज्ञानदीप दिवाळी अंकातील संपादकीय
दिवाळी अंकास मराठी साहित्य परंपरेत एक महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात एरवी फारसे वाचन न करणारा माणूसही दिवाळी अंक अगत्याने वाचतो. ज्ञानदीप दिवाळी अंक काढण्यामागे सर्व वाचकांचे लक्ष ‘आपला भारत’ या संकल्पनेकडे वेधण्याचा ज्ञानदीपचा प्रयत्न आहे.

यंदाची ही दिवाळी भारतापुढे अनेक नव्या समस्या व आव्हाने घेऊन आली आहे. समस्यांवर मात करून आत्मविश्वासाने व एकदिलाने राष्ट्र उभारणीचे कार्य केल्यास भारत सर्व जगात बलशाली व आदर्शवत्‌ ठरू शकेल मात्र लोकशाही आणि राष्ट्रीय भावनेकडे दुर्लक्ष झाले तर देशाची अधोगतीही होऊ शकते हे भारताच्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणे व त्याप्रमाणे जबाबदार वर्तन करणे आवश्यक आहे.


भारताला आज अनेक समस्यांनी घेरले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातील बर्‍याच समस्या आपणच निर्माण केल्या आहेत. समस्यांची यादी मोठी आहे पण महत्वाच्या समस्यांचा विचार खाली केला आहे.


फुटीरता वा एकात्मतेचा अभाव - जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या भिंती अधिक बळकट होऊ लागल्या आहेत. आर्थिक वा राजकीय स्वार्थासाठी या भिंतींचा उपयोग आपले वेगळे गट करण्यासाठी होत आहे. या गटांतील संघर्ष वाढू लागले आहेत व त्याचा देशाच्या एकात्मतेवर व परस्पर विश्वासावर विघातक परिणाम होत आहे.


व्यसनाधीनता - दारू व तंबाखू वा तत्सम मादक पदार्थांचे सेवन समाजात, मुख्यत्वे युवावर्गात वाढत असून त्याला खोट्या प्रतिष्ठेचे वलय प्राप्त झाले आहे. दारू सेवनामुळे अनेक गरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडून आर्थिक नुकसान होत आहे. सध्याचे कायदे त्यावर प्रतिबंध करण्यास कुचकामी ठरत आहेत. समाजात गुन्हेगारी, हिंसा, अपघात व भ्रष्टाचार वाढण्यासही ही व्यसने मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.


अंधश्रद्धा- धार्मिक अंधश्रद्धेने आपल्या समाजास पूर्वीपासूनच जखडून टाकले आहे. वैज्ञानिक पद्धत अजून आपल्या पचनी पडत नाही. केवळ अंधश्रद्धा नाही तर सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नव्या अंधश्रद्धेचा उदय झाला असून व्यक्तिपूजेस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. पक्षाचा वा सामाजिक विचारसरणीचा चष्मा लावूनच नागरिक प्रत्येक घटनेकडे पहायला शिकला आहे. लोकांच्या सामूहिक सदसद्विवेकास सर्वश्रेष्ठ मानणार्‍या लोकशाहीऎवजी काही व्यक्ती वा गटांनी केलेली हुकुमशाही आपल्याला पहायला मिळत आहे. आपल्या जातीचा, धर्माचा, भाषेचा, पक्षाचा वा गटाचा अतिअभिमान, आपल्या हक्कांसाठी दुसर्‍यांच्या हक्कांची पायमल्ली, राष्ट्रीय संपत्त्तीचे नुकसान, लूटमार व हिंसा अशा लोकशाहीशी पूर्णपणे विसंगत गोष्टींना समाजात पाठिंबा व यश मिळत आहे ही खेदाची गोष्ट आहे.


आर्थिक दिवाळखोरी - सारे जग आज आर्थिक मंदीत सापडले आहे. भारतात आर्थिक मंदीबरोबरच आर्थिक असमानताही पराकोटीला गेली आहे. कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही न थांबवता येणारी व राजकीय फायद्याची गोष्ट वनत आहे.पाश्चात्य संस्कृतीतील उपभोगवादाचा पगडा समाजावर वाढत आहे. नवी कार्पोरेट संस्कृती छोट्या उद्योगांना मारक ठरत आहे.


पर्यावरणहानी - लोकसंख्या वाढ व बेरोजगारी यामुळे मोठ्या शहरांत अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. उर्जा संकट अधिकाधिक तिव्र होऊ लागले आहे. प्रगतीसाठी औद्योगीकरणाची भारताला गरज आहे मात्र जमिनी व निसर्गसंपदेच्या हानीमुळॆ नव्या औद्योगीकरणाला विरोध होत आहे.


दहशतवाद - या सर्व समस्यांबरोबरच दहशतवादाने भारतात उग्र स्वरूप धारण केले असून सर्वसामान्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बाजार, धार्मिक स्थळे व गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांचे लक्ष होत आहेत.


या सर्व समस्यांवर यशस्वीपणे मात करावयाची असेल तर प्रखर राष्ट्रीय वृत्तीची जोपासना हॊण्याची नितांत गरज आहे. व्यक्तीपेक्षा विचाराला, पक्षापेक्षा राष्ट्रीय हिताला, अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक सत्याला महत्व दिले पाहिजे. ‘माझा भारत - आपला भारत’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे व तसे जबाबदार व समर्पण वृत्तीने कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे.

दिवाळीचे चारही दिवस आपल्याला याचीच आठवण करून देतात. नरकचतुर्दशी म्हणजे अमंगळाचा नाश. अमंगळ हे अस्वछतेला जसे लागू पडते तसे वाईट व्यसने व विचार यांनाही लागू केले पाहिजे. लक्ष्मी पूजन म्हणजे चांगल्या मार्गाने व स्वकष्टाने मिळविलेल्या संपत्तीचा सन्मान व तिच्या योग्य उपयोगाचा वा विनियोगाचा संकल्प. पाडवा म्हणजे नवी आव्हाने स्वीकारण्याची तयारी. भाऊबीज म्हणजे सर्वाविषयी बंधुभावाची व आपुलकीची भावना.


वरील सर्व समस्या भेडसावत असतानादेखील भारताने काही नेत्रदीपक प्रगती केली आहे हे लक्षात घ्यावयास हवे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय उद्योग व भारतीय तरूणांनी जागतिक पातळीवर नेतृत्व मिळविले आहे. संस्कृती, अध्यात्म व योगविज्ञान यात भारत जगाला मार्गदर्शक ठरत आहे. अणुसंपन्न राष्ट्रगटाशी अणुकरार करून उर्जाक्षेत्रात प्रगतीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. चंद्राकडे ‘चांद्रयान-१’ सोडून अवकाश क्षेत्रातही भारताने आपले स्थान उंच केले आहे.
ज्ञानदीपच्या या दिवाळी अंकातील साहित्य यातील काही दृष्टीने उद्‌बोधक ठरेल असे वाटते.

No comments:

Post a Comment