Sunday, February 12, 2012

बहुढंगी करमणूक

मल्टीमिडीया याला पर्यायी मराठी नाव मी बरेच दिवस शोधत होतो. दृक्‌श्राव्य हा संस्कृत शब्द योग्य असला तरी तो मराठीसाठी तसा उपराच वाटतो. बहुरंगी करमणूक या पुस्तकाची माहिती लिहिताना मला जाणवले की ‘बहुढंगी’ हाच यासाठी योग्य शब्द ठरेल. बहुरंगी करमणूक या पुस्तकात मुखपृष्ठ सोडल्यास कोठेच वेगळा रंग नाही. पण तेथे रंग हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला आहे. तसेच ढंग हा शब्दही रंग, रूप, आवाज व हालचाल या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून वापरता येईल.

संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मनोरंजन क्षेत्राला नवी संजीवनी मिळाली आहे.व्हिडीओ गेम्सनी सार्‍या जगाला भुरळ घातली आहे. विकसित देशात तर पुस्तके, खेळणी, टीव्ही, मोबाईल या सर्व माध्यमात मल्टीमिडीया आधारित मनोरंजन हा मोठा व्यवसाय बनला आहे. २००३ मध्ये मी अमेरिकेत असतानाच मला याची प्रचिती आली होती. माझ्या ब्लॉगची सुरुवात मी Toy Mania या नावाचा लेख लिहून केली होती. त्यात अशा व्यवसायाचा नवीन पिढीवर किती वाईट परिणाम होत आहे याबद्दल मी माझे मत मांडले होते.

आता मल्टीमिडीया तंत्रज्ञानाने मनोरंजनातून शिक्षण देण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ही चांगली गोष्ट आहे. बहुरंगी करमणूक या पुस्तकातील हसत खेळत शिक्षण या तत्वाचेच आधुनिक रूप म्हणजे ही बहुढंगी करमणूक आहे असे मला वाटते.

शिक्षणासाठी मल्टीमिडीया तंत्रज्ञान वापरल्याने शिक्षण (e-Learning) तर प्रभावी होतेच पण त्याचे स्वरूप पुस्तकी न राहता त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात कोठे व कसा उपयोग होतो हे दाखविता येत असल्याने शिक्षणाचे उद्दिष्टही पूर्णपणे साध्य होते.

शिक्षणातील मल्टीमिडीयाचे महत्व वाढल्याने या तंत्रज्ञानाच्या संशोधनास अधिक चालना मिळाली आहे. फ्लॅश/ फ्लेक्स प्रोग्रॅमिंग व व्हीडिओ एडिटींग या क्षेत्रात जागतिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पुणे, मुंबई, हैदराबाद,बंगलोर, दिल्ली, चेन्नई यासारख्या महानगरात अशा अनेक कंपन्या वरील आधुनिक विषयात तज्ज्ञ असणार्‍या व्यक्तींच्या शोधात आहेत. दुर्दैवाने प्रचलित शिक्षणपद्धतीत संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमातही या तंत्रज्ञानाला विशेष स्थान नाही. शिवाय हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्याने या क्षेत्रातील शिक्षणास स्थायी अभ्यासक्रम पद्धत उपयुक्त ठरत नाही.

काळाची पावले ओळखून आमच्या ज्ञानदीप इन्फोटेकमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याचा अभ्यास व उपयोग ही पद्धत अवलंबल्याने सांगलीसारख्या छोट्या शहरात राहूनही उच्च दर्जाचे काम व मोठ्या शहराप्रमाणे जास्त आर्थिक लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
आता हे ज्ञान सांगलीतील रोजगाराच्या शोधात असणार्‍या हुशार मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने वेब डिझाईन व फ्लॅश/ फ्लेक्स प्रोग्रॅमिंग मराठीतून शिकविण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा सर्वांना व्हावा म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून याविषयी लेख व प्रात्यक्षिके व प्रकल्प याची माहिती देण्याचा संस्थेचा मनोदय आहे.

याचा पुढचा टप्पा म्हणजे या क्षेत्रात काम करू शकणार्‍या विविध ठिकाणच्या व्यक्तींना सहभागी करून व प्रशिक्षित करून त्याना घरबसल्या काम मिळवून देणे हा आहे.

Saturday, February 11, 2012

बहुरंगी करमणूक - पुस्तक परिचय

माझे गुरू व नंतर वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधील माझे ज्येष्ठ सहकारी कै. रा. त्र्यं. रानडे यांनी अनेक कोडी, विनोद, कसरती, करामती यांचा संग्रह करून ‘बहुरंगी करमणूक’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. १९४९ ते १९६७ या काळात या पुस्तकाचे तीन भाग प्रसिद्ध झाले. पुस्तकातील भाषा चित्तवेधक व खेळकर शैलीत लिहून कै. रानडे यांनी या पुस्तकांना एक वेगळी उंची मिळवून दिली. ही पुस्तके लहान थोर सर्वांनाच फार आवडली व त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.


आज ही पुस्तके फक्त काही जणांकडे व जुन्या वाचनालयातच उपलब्ध आहेत. आजच्या पिढीला या पुस्तकांची ओळख करून देणे हा या लेखाचा उद्देश आहे.
पुस्तकात खालील विभाग आहेत.
* फसाल बरं का !
* हसाल बरं का!
* नीट सांगा बरं का !
* केवळ दृष्टीनेच ओळखा.
* कुठे आहे चूक ?
* बडे आकडेशास्त्रज्ञ व्हा.
* परीक्षा
* उत्तरे
बहुरंगी करमणूक पहिला भाग-प्रास्ताविक - सारांश
अनेकांचा एकच प्रश्न !
कंटाळवाणा काळ काढावयाचा कसा ? ... अगदी सार्‍या सार्‍यांची हीच अडचण.! आणि म्हणूनच पोरासोरांपासून तो म्हातार्‍या कोतार्‍यांपरयंत, छोट्या बाळापासून तो काठी टेकीत जाणार्‍या रंगोपंतापर्यंत, सार्‍यांची हीच अडचण भाग्विण्यासाठी ‘बहुरंगी करमणूक ’ मोठ्या तत्परतेने सिद्ध ठाकले आहे.
अर्थात केवळ कालहरण इतकाच मात्र त्यातील हेतु निश्चित नव्हे. आणखी कितीतरी भाग त्यात आहे.
.....
बहुरंगी करमणूक तुमची प्रवासात उत्तम सोबत करील आणि तुमच्या सहली नि सफर तर त्याविना निश्चित अळणी ठरतील ! हे पुस्तक तुमची भरपूर करमणूक करील. नेहमीच्या चाकोरीबाहेर ते तुम्हाला घेऊन जाईल. निरनिराळ्या करामती नि गमती सांगेल आणि पुस्तक वाचन थांबविल्यावर तुम्हाला आढळून येईल, की तुमचा शीण नाहिसा झाला आहे आणि कंटाळ्याने तर केव्हाच काळे केले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हेही समजून येईल की घटकाभर मन रंजन करता करता या पुस्तकाने तुमच्या मनाला तरतरी आणली आहे नि तुमच्या बुद्धीचे वेगवेगळे पैलूही तुम्हाला कळत नकळत त्याने मोठ्या कौशल्याने उजळले आहेत. तसेच त्याद्वारे चारचौघावर छाप पाडण्यास योग्य अशी नाना प्रकारची भरगच्च सामुग्रीही आता तुमच्या हाती लागली आहे.

`बहुरंगी करमणूक' पुस्तकाच्या तिसर्‍या भागात लेखकाने करमणूक, कोडी व त्यातून मिळणारे शिक्षण व बुद्धीला कार्यप्रवण करण्याचे कार्य कसे होते याविषयी मौलिक विचार मांडले आहेत. ते त्यांच्याच शब्दांत वाचा.



या पुस्तकातील कोडी व कूट प्रश्नांनी मला अधिक चौकस बनविले व करमणुकीच्या या पद्धतीने शिक्षण किती आनंददायी ठरते हे लक्षात आले. स्वतः स्थापत्य अभियांत्रिकीत तज्ज्ञ प्राध्यापक असूनही त्यांनी लहान मुलांसाठी, हसत खेळत त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, यासाठी वेळ काढून अशी पुस्तके लिहिण्याचे कार्य केले. त्यापासून मला अशा कार्याची आवश्यकता पटली असून असे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना माझे नम्र अभिवादन
---
‘बहुरंगी करमणूक’ एकमेव विक्रेते - अभिनव पुस्तक मंदीर, डेक्कन जिमखाना, पुणे - ४

Sunday, February 5, 2012

नागरिकशास्त्र - एक महत्वाचा पण दुर्लक्षित विषय

शालेय स्तरावर अभ्यासास असणार्‍या विविध विषयांच्या भाऊगर्दीत नागरिकशास्त्र हा महत्वाचा विषय आपले महत्व हरवून बसला आहे. लहान मूल जसे मोठ्यांचा हात धरून असते त्याप्रमाणे इतिहास भूगोलाच्या विषय जोडगोळीत नागरिकशास्त्रास अंग चोरून बसावे लागत आहे. प्रश्नपत्रिकेतही या विषयावर एखादाच प्रश्न व तोही क्लिष्ट व्याख्या व मुद्दे पाठ करून लिहावा लागत असल्याने मुले शक्यतो हा विषय ऑप्शनला टाकतात. साहजिकच सुजाण नागरिक बनण्याचे शिक्षण न घेताच शालेय शिक्षण पूर्ण होते.

आपल्या देशात राज्यघटना, लोकशाहीचा खरा अर्थ, नागरिकांची कर्तव्ये याबाबतीत सर्वसामान्य जनतेत जे अज्ञान दिसून येते याला नागरिकशास्त्रासारख्या महत्वाच्या विषयाकडॆ केलेले अक्षम्य दुर्लक्षच कारणीभूत आहे असे मला वाटते.

आपल्याकडे नागरिकशास्त्र या विषयाला महत्व दिले जाते ते फक्त प्रशासकीय उच्च पदासाठी असणार्‍या स्पर्धा परिक्षांमध्ये. या परिक्षा देणार्‍यांची संख्या फारच कमी असते. नागरिकशास्त्र सर्व जनतेसाठी असावयास हवे व ते लहानपणीच, संस्कारक्षम वयात म्हणजे शालेय स्तरावर दिले गेले पाहिजे. राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठीदेखील नागरिकशास्त्राची पदवी परिक्षा अनिवार्य ठेवली तर राजकारण व सहकार यात निश्चित सुधारणा होईल.

इतर सर्व विषय व्यक्तीमत्व विकास व व्यवसाय यांसाठी आवश्यक असल्याने त्यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजते. मात्र नागरिकशास्त्रास व्यक्तीच्या दृष्टीने फार महत्व नसले तरी समाजाच्या व देशाच्या दृष्टीने याला अनन्य साधारण महत्व आहे. हा विषय अधिक सोपा, रंजक करून तसेच त्याला कृतीशील उपक्रमांची जोड देऊन लोकशाही, समाजवाद व राष्ट्रीयत्व यांचे महत्व मुलांच्या मनावर बिंबवले तर मोठेपणी त्यांचेकडून भ्रष्टाचार, विध्वंसक कृत्ये घडणार नाहीत. जातीय, धार्मिक वा प्रांतीय भेदांच्याऎवजी राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्या मनात जागृत होईल व शांतता, विकास व सहजीवन या दिशेने भविष्यात आपल्या देशाची वाटचाल सुनिश्चित होईल.

Tuesday, January 31, 2012

कागदाची स्प्रिंग व भिरभिरे

१. कागदी दोन पट्ट्या कापून चित्रात दाखविल्याप्रमाणे उलट सुलट घड्या घालून कागदाची छोटी स्प्रिंग बनविता येते.


२. कोलगेट वा अन्य ट्यूबच्या रिकाम्या बॉक्सच्या पट्ट्या कापून अधिक चांगली स्प्रिंग तयार करता येते.

चित्रात दाखविल्याप्रमाणे कापलेल्या पट्ट्या मध्य्भागी दुमडाव्यात. नंतर एका दुमडलेल्या पट्टीच्या दोन्ही बाजूतून दुसर्‍या पट्टीच्या बाजू घालून कोन करावा. या जोडाची एक बाजू बंद असून दुसर्‍या बाजूस दोन पट्ट्य़ा मोकळ्या राहतात. त्यातून तिसर्‍या पट्टीच्या बाजू घालून ही साखळी वाढवावी. अशीच क्रिया पुनःपुन्हा करीत सर्व पट्ट्या जोडून स्प्रिंग तयार करावी ही आता कमी जास्त लांबीची करता येते. या साखळीचा उपयोग करून आणखीही चांगली डिझाईन करता येतील.

कागदाचे भिरभिरे.
केवळ तीन पट्ट्या मध्ये दुमडून व एकमेकीत अडकवून भिरभिरे तयार करता येते. काडीच्या टोकावर ते उभे धरले तर वारा असेल तर ते फिरू लागते. असे भिर्भिरे करून पंख्याखाली धरल्यास सुदर्शन चक्रासारखे ते दिसते.


हेच भिरभिरे उलट धरून उंचावरून खाली टाकले तर फिरत फिरत खाली येते.

Saturday, January 28, 2012

विकल मन आज

सकाळच्या वर्तमानपत्रातील संप मोर्चे, अपघात व पुढार्‍यांचे फॊटो व प्रक्षोभक भाषणे यांचे ठळक मथळे वाचल्यावर मला पेपर पुढे वाचवेना. नेहमीच्या सवय़ीप्रमाणे आजच्या बातम्या पहाण्यासाठी टीव्ही सुरू केला. निवडणुकीचा मोसम सुरू झाल्याने भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप, पक्षबदल, दारू, पैसा व बंदुकांचा निवडणूक जिंकण्यासाठी वापर कसा सर्रास वापर होत आहे हे दाखविणार्‍या सनसनाटी बातम्या एवढेच सर्व चॅनेलवर चालू होते. माझे मन उद्विग्न झाले. टीव्ही बंद केला व रेडिओ लावला. रेडिओवर ‘विकल मन आज झुरत असहाय’ अशी नाट्यगीतातील धुन चालू होती. मनात विचार आला की भारतातील लोकशाहीची सध्याची दशा पाहिली की सामान्य जनतेची स्थिती या गाण्यासारखीच झाली आहे.

निवडणुकीच्या अशा हुल्लडीतून लोकांसाठी लोकांनी चालविलेले राज्य ही लोकशाहीची व्याख्या किती फसवी आहे याची जाणीव झाल्याने विकासाच्या आशेने भविष्याकडे डोळे लावून बसलेल्या जनतेची पूर्ण निराशा झाली आहे. सत्ता व पैसा नेत्यांच्या हाती पडणार पण आपल्या हाती आश्वासनांखेरीज काहीच उरणार नाही याचे आकलन जनतेला होऊ लागले आहे.

या निराशेतून मानसिक संतुलन बिघडणे, अतिरेकी कृत्य, हिंसाचार, आत्महत्या यासारख्या व्यक्तीगत उद्रेकाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गुंडगिरी, दहशत, लुटालूट व दरोडे घालणार्‍या टोळ्या तयार होत आहेत. हे सर्व लोकशाहीला अराजकाचे स्वरूप देत आहेत. यावर उपाय होताना लोकशाहीचे हुकुमशाहीत वा लष्करशाहीत केव्हा रुपांतर होईल हे कळणारही नाही.

देशाचे राहू द्या. अगदी छोट्या गावात किंवा संस्थेत नेत्यांची सत्त्ता हस्तगत करण्यासाठी चाललेली धडपड पाहिली की आपण लोकशाहीसाठी पात्र आहोत की नाही याचीच शंका येऊ लागते. लोकशाहीत लोकप्रतिनिधी ठरविण्यासाठी निवडणूक हा रास्त मार्ग आहे. पण निवडून य़ेण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी, शक्तीप्रदर्शने, पक्षबदल व मतदारांचे विविध मार्गांनी होणारे लांगूल चालन पाहिले की निवडणुकीवरील विश्वासच उडतो.

पक्षाचे तिकीट मिळाले नाही वा मिळण्याची शक्यता नाही हे कळल्यावर उमेदवाराची किती घालमेल होते हे आता सर्वांच्या माहितीचे झाले आहे. आजपर्यंत ज्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो वा नेत्याचा प्रत्येक शब्द झेलत राहिलो व त्याच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करीत राहिलो त्या पक्षाविषयी एकदम घृणा, द्वेष उफाळून येऊन विरोधी पक्षाविषयी विलक्षण कळवळा निर्माण झाल्याचे वाचून आपल्याला हसावे का रडावे हे समजत नाही. ज्यांच्याबरोबर आयुष्यभर सुखदुःखात सहभागी झालो त्या मित्रांच्या व कुटुंबातील नजिकच्या नातेवाईकांशी वैर पत्करून निवडणुकीसाठी वा वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षबदल करणारी माणसे पाहिली की मन उदास होते.

माझ्या लहानपणी मीही निवडणुका पाहिलेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण, वाजपेयी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, नाथ पै, आचार्य अत्रे अशी दिग्गज मंडळी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत. त्यावेळी होणारी नेत्यांची भाषणे म्हणजे वैचारिक ज्ञानाचा मोठा खजिना असे. कोणत्याही पक्षाचा प्रचार असो. नेत्यांचे भाषण म्हणजे आपल्या विचारांना एक नवे खाद्य मिळत असे. कवी व लेखकही आपापल्या साहित्यिक कलेचा अनोखा नमुना सादर करून प्रचारात रंगत आणत. कॉंगेस पक्षाच्या प्रचारासाठी कवी. ग. दि. माडगुळकरांचे गीत त्याच्या प्रासादिकतेमुळे फार प्रसिद्ध झाले होते. इतर पक्षही देशभक्तीची गाणी व शिवरायांच्या पराक्रमाची गीते आपल्या प्रचारात वापरत असत. वर्तमानपत्रे विशिष्ट विचारसरणी्शी बांधलेली असायची व त्यात चांगले अभ्यासपूर्ण लेख असत.

तो काळ आता विस्मृतीच्या पडद्याआड गेला आहे. आता निवडणूक हा वैयक्तिक स्वार्थावर आधारित राजकारणाचा हमरीतुमरीचा खेळ बनला आहे. विचारांची बांधिलकी व पक्षनिष्ठा यांना काहीही महत्व उरलेले नाही. अशा निवडणुकीत यशस्वी होणारे नेते स्वतःला लोकप्रिय लोकप्रतिनिधी खुशाल समजोत. जनतेला त्यांचे खरे स्वरूप समजले आहे.

जनतेचे मन विकल होऊन ती असहाय बनली आहे. निवडणुकांचे सध्याचे बाजारी स्वरूप बदलले तरच खर्‍या सशक्त लोकशाहीची स्थापना होऊ शकेल व जनतेची विकासाची व समृद्धीची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील.