Sunday, April 19, 2015

रस्त्यांचे रजिस्टर

रस्त्यांचे रजिस्टर ठेवून त्यात दुरुस्तीविषयी माहिती नोंदण्याची सूचना सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या मा. महापौरांनी केल्याचे वाचनात आले. त्यांच्या या उपयुक्त सूचनेबद्दल त्यांचे अभिनंदन. खरे पाहता, रस्ते, पाण्याचे नळ, कचराकुंड्या, विजेचे खांब अशा सर्व गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे.

उदाहरणच द्यायचे झाले तर शहरातील प्रत्येक रस्त्याची माहिती म्हणजे तो तयार केव्हा केला, दुरुस्ती केव्हा केली, ट्रॅफिक किती आहे, अपघात किती झाले यांच्या माहितीचा आढावा घेतल्यास रस्त्याच्या आरोग्याविषयी आपल्याला अंदाज बांधता येईल. हा अंदाज इशारा स्वरुपात संगणकावर दिसू शकण्याची योजना करता येईल म्हणजे रस्ता धोकादायक बनला आहे व तो लगेच दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे हे त्या रस्त्याची माहितीच आपल्याला सांगू शकेल. मग लोकांच्या तक्रारीची वाट न बघता त्यावर वेळीच उपाय योजना करता येईल.

सध्या अशा निर्जीव सेवासुविधांविषयीच्या तक्रार लोक व नगरसेवक संबंधित खात्याकडे करतात. यात जो तक्रार करील वा ज्या नगरसेवकाचा दरारा मोठा त्याच रस्त्याचे भाग्य उजळते. आवश्यकता नसली तरी अशा रस्त्यांचे नूतनीकरण होते. इतर रस्त्यांची स्थिती अगदी खालावलेली असली तरी प्रभावी तक्रारीअभावी त्यांची कोणी दखल घेत नाही. परिणामी एखादा मोठा अपघात सगळ्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधतो. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. घडायचे ते घडून गेलेले असते.

जी गोष्ट रस्त्याची तीच प्रत्येक नागरिक सुविधेची, प्रदूषणाची, धोकादायक परिस्थितीची. या सर्वांची कालबद्धमाहिती  आधुनिक उपकरणांच्या व सर्वंकष माहिती व्यवस्थापनाच्या आधारे स्वयंचलित पद्धतीने नोंद करण्याची यंत्रणा विकसित केली व धोकादर्शक स्थितीबद्दल अलर्ट सिग्नल मिळण्याची व्यवस्था केली तर अपघात टळतील, प्रदूषण वाढणार नाही व शहरातील सर्व सेवासुविधा विनातक्रार काम करतील. सर्वांचा विकास लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय केवळ गरज व गुणवत्ता यांच्या आधारे करणे शक्य होईल.

सध्याच्या इ-गव्हर्नन्सच्या युगात अशी नोंद कॉम्युटरवर करणे सहज शक्य आहे.  महापालिकेच्या वेबसाईटवर अशी माहिती नागरिकांना पाहण्यास उपलब्ध केली व त्यांच्या सूचना वा तक्रारी नोंदण्याची व्यवस्थाही वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्यास महापालिकेच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल व नागरिकांच्या तक्रारींनाही त्वरित योग्य न्याय मिळेल. मा. महापौरांनी याबाबतीत पुढाकार घेतल्यास सांमिकु महापालिका महाराष्ट्रात आदर्श ठरेल. भावी स्मार्ट सिटीच्या योजनेसाठीही ही एक चांगली  सुरुवात ठरेल.

No comments:

Post a Comment